ग्रामीण भागात युवक-युवतींना श्रमसंस्काराचे धडे :
लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर (मरळी) येथे स्वच्छता अभियानाचे आयोजन :
लोकनेते बाळासाहेब देसाई कृषी महाविद्यालय, दौलतनगर (मरळी) येथे दिनांक ८ ऑक्टोबर २०२५ रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या (NSS) पथकातर्फे विशेष श्रमसंस्कार व स्वच्छता अभियान कार्यक्रम उत्साहात पार पडला. “स्वच्छ भारत अभियान” अंतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आणि कर्मचारीवर्गाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले की, “विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेचे महत्त्व जागविणे आणि समाजाप्रती जबाबदारीची भावना विकसित करणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.”
या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक प्रा. जी. ए. शेख, प्रा. एस. एस. राऊत, प्रा. एस. ए. पटेल, प्रा. एस. व्ही. नेवसे, प्रा. टी. जे. जाधव आणि प्रा. एम. एन. तळप यांनी सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी परिसरातील विविध भागांची स्वच्छता करून परिसर स्वच्छ, सुंदर आणि प्रदूषणमुक्त ठेवण्याचा संकल्प केला.
या उपक्रमाबद्दल मा. नामदार श्री. शंभूराजे देसाई (मंत्री, पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री सातारा) तसेच मा. श्री. रविराज देसाई (अध्यक्ष, मोरणा शिक्षण प्रसारक मंडळ, मरळी), मा. श्री. यशराज देसाई (चेअरमन, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखाना लि., दौलतनगर), युवानेते जयराज देसाई व आदित्यराज देसाई यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून प्रशंसा व्यक्त केली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी NSS कार्यक्रम अधिकारी, प्राचार्य, प्राध्यापकवर्ग तसेच सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. या उपक्रमाद्वारे ग्रामीण भागातील युवक-युवतींनी श्रमसंस्कार, स्वच्छता आणि सामाजिक बांधिलकीचे मूल्य आत्मसात केले, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.